पुष्पाग्रज : अशोक नाईक तुयेकर : शिक्षण बीएससी(केमिस्ट्री) : शिक्षक: पत्रकार

पुष्पाग्रज : अशोक नाईक तुयेकर : शिक्षण बीएससी(केमिस्ट्री) : शिक्षक: पत्रकार

कवितेचे हस्ताक्षर


ही कविची पहिल्या काव्यसंग्रहातील (कॅलिडोस्कोप) अनुक्रमाने पहिली कविता आहे. ही कविता हस्ताक्षरात छापली आहे हेही कल्पक वाटले.

गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे सुवर्णपदक घोषित

 कवी पुष्पाग्रज यांना गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे गोमंतक मराठी साहित्य संमेलनानिमित्त दिले जाणारे सुवर्णपदक घोषित झाले आहे. नियोजित 28वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन पेडणे येथे होणार आहे.

यासंबंधी शनिवार दि. 24 एप्रिल 2021 रोजी दै. लोकमत गोवा आवृत्तीत (पान 9) प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे - (सुवर्णपदक मानकरी निवडण्यासाठी) नेमलेल्या समितीने त्यांच्या नावाची शिफारस केली. पुष्पाग्रज हे गोमंतकातील आणि एकुणच मराठी साहित्यविश्‍वातील प्रसिद्ध कवी आहेत. विनोदी लेखक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. पेडणे येथे होणार्‍या 28व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात त्यांना सुवर्णपदक प्रदान केले जाईल.


पहिल्या काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती


कॅलिडोस्कोप : दुसरी आवृत्ती :
गोमंतक साहित्य सेवक मंडळ, पणजी : 2012
पहिल्या काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती
कवी पुष्पाग्रज यांच्या ‘कॅलिडोस्कोप’
कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे
ही कवीच्या भाग्याची बाब आहे. कवी पुष्पाग्रज
यांच्या ‘कॅलिडोस्कोप’मधील कविता नवकाव्याच्या
जातकुळीच्या आहेत. उच्च काव्यधर्माची प्रचिती
देणारी अशी ही कविता आहे. आशयाची
आत्ममग्नता, नावीन्यपूर्ण शब्दरचना व
प्रतिक्रियात्मक प्रकटीकरणामुळे ‘कॅलिडोस्कोप’
काव्यसंग्रहातील कविता वाचनीय झाल्या आहेत.
वरवर वाचून ह्या कविता समजण्यासारख्या नाहीत.
एकाग्र मनाने कवीच्या शब्दविश्‍वाचा शोध घेत
वाचल्या तरच ह्या कविता समजण्यासारख्या
आहेत. कॅलिडोस्कोपमधल्या रंगतरंगी आकृत्तींच्या
दृष्टीकोनातून पाहिलं तर ह्या कवितेची काव्यगर्भता
विविध विषयांना स्पर्श करताना जाणवते. गंभीर
प्रकृतीची पुष्पाग्रज यांची कविता प्रतिमा, प्रतीकांनी
सजलेली आहे. एका कवितेत कवी लिहितो - ‘होडी
बुडते आहे हे कळल्यानंतरचा हा प्रवास’ असाच
प्रवास आहे ह्या काव्यवैभवाचा. ह्या संग्रहात ग्येय
कविता कमी आहेत, पण मुक्तछंदाचा दर्जेदार व
नावीन्यपूर्ण वापर कवीने केला आहे. विविध
पातळींवर घेतलेला आत्मशोध हा ह्या कवितेचा मूळ
स्वभाव आहे. ‘गोकुळ’ ही ह्या संग्रहातली सर्वात
श्रेष्ठ दर्जाची कविता आहे. अशा दर्जाची
काव्यनिर्मिती कवीने ह्यापुढेही करावी, हीच इच्छा

- सुदेश शरद लोटलीकर
(कॅलिडोस्कोप (दुसरी आवृत्ती)चा ब्लर्ब)

''कवीने एका कॅलिडोस्कोपला आपले डोळे लावलेले आहेत.''

कॅलिडोस्कोप : पहिली आवृत्ती : 
शारिवा प्रकाशन, डोंबिवली : 1983
पुष्पाग्रज यांची कविता प्रकृतीने आत्ममग्न आहे. ही आत्ममग्नता प्रतिक्रियात्मक आहे. भोवतालच्या भयाण नकारभरल्या वास्तवाच्या संदर्भातील  प्रतिक्रिया म्हणून ती  उद्भवली आहे. कवीने एका कॅलिडोस्कोपला आपले डोळे लावलेले आहेत. रंगरेषांच्या चित्रविचित्र आकृत्या त्याला त्यात दिसतात. स्वप्नवास्तवाच्या पातळीवर एक स्वतंत्र जग त्याला त्यात दिसते. वास्तवापासून सतत असे तुटून राहण्यातला धोकाही कवीने ओळखलेला आहे म्हणूनच तो हट्टाने कधी कधी हा  कॅलिडोस्कोप दूर ठेवतो. भगभगीत उन्हाकडे व भळभळत्या दु:खाकडे नागव्या डोळ्यांनी बघू पाहतो. दु:खाच्या या डोळेभेटीमुळे निर्माण होणारे आंतरिक ताणतणाव साहजिकच त्याच्या कवितेतून प्रकटू लागतात. उत्तर रात्री रस्त्याच्या कडेला एखादे निराधार अस्तित्व गुडघ्यात मान खुपसून दीर्घ हुंदक्यानी रडताना दिसले तर आपणही संबंध नसताना अकारण गदगदून जातो. तशीच भावना, तेच गदगदणे, तेच आतून अकारण उन्मळणे, निखळ अमूर्त दु:खाचा तोच प्रत्यय देणार्‍या या कविता म्हणजे आर्त, उदास ह्रदयातून झंकारणार्‍या छंदमुक्त विराण्याच आहेत…

-नरेंद्र बोडके
कॅलिडोस्कोप काव्यसंग्रहाच्या पहिल्या आवृत्तीच्या मलपृष्ठावरून

ननरुख : नारायण सुर्वे यांच्या प्रस्तावनेतून..

नन्रूख : लोकवाङ्मयगृह प्रकाशन : 
पहिली आवृत्ती : एप्रिल 1992
‘नन्रूख’ म्हणजे लहानसे झाड. गोव्याच्या बोलीभाषेतील हा एक शब्द. ह्या शीर्षकाने कवीमनाची विनम्रता तर जाणवतेच परंतु स्वत:विषयीची स्पष्टताही आढळते. कोणताही कलावंत अथवा कवी समग्र कल्लोळ स्वत:त मुरवत त्यांना कलेच्या पातळीवर, रचनेच्या स्वरूपात मांडू लागतो किंवा लिहू लागतो तेव्हा तो नम्र भूमिकेने, सड्या वृत्तीने ह्या सर्व उपस्थित क्षणांना सामोरा गेेलेला असतो. असे ‘सामोरा होणे’ ही कोणाही कलावंताची पूर्व अट असते असे मला वाटते.

श्री. पुष्पाग्रज यांच्या पहिला कवितासंग्रहापेक्षा ‘नन्रूख’ अधिक सकस, अधिक मोकळ्यावृृत्तीने झेप घेतलेला व विविधांगांनी जीवनाकडे डोळसवृत्तीने परंतु तरलपणाने, कधी-धूसर स्वरूपात तर कधी अधिक आत्ममग्न होत, तर कधी हळव्या वृत्तीने भारलेल्या अशा भाववृत्तींना चित्रीत करणारा संग्रह आहे. तरुण मनाचे हळवे स्पंदन जसे ह्या कवितेत जाणवते तसेच ते आत्मसंवादी रूपातही अभिव्यक्त होतांना आढळते. आत्मलक्षी आणि बहिर्मुखता यांच्या ताणतणावातही धूसरतेचे आवरण तिला घेऊ लागते की काय असेही वाटते. ह्या सर्व वृत्तींची संवेदनेच्या पातळीवरची घुसळण ही आजच्या एकूण तरूण कवीमनाची वास्तवता आहे. घालमेल आहे. आणि ही ओढाताण असणे हे माझ्या मते तरी एक चांगले लक्षण आहे.

नारायण सुर्वे
‘नन्रूख’च्या प्रस्तावनेतील सुरूवातीचा भाग.

''असतेपणाचा सतत सुलगत राहणारा जिवंत ठणका''

शांती अवेदना : ग्रंथाली : 
पहिली आवृत्ती :26 जानेवारी 2010
कवीचं असतेपण आणि या असतेपणाचा सतत सुलगत राहणारा जिवंत ठणका ‘पुष्पाग्रज’ यांच्या कवितेतून जाणवत राहतो. व्यक्ती-समष्टी-सृष्टी यांच्यातल्या मूलभूत गाभ्याला स्पर्श करण्याची अनिवार कांक्षा हा या कवितेचा ‘स्व’भावधर्म आहे. म्हणूनच ही कविता पृष्ठस्तरापेक्षा, बाह्यात्कारापेक्षा एखाद्या गिरमिटासारखी अधिक आत आत, खोलवर जाऊन, आतूनच मोडून पडलेल्या तरल संवेदनाविश्‍वाचा शोध घेते; अर्थ लावू पाहते.

कधी नुसताच भगभगीत उजेड
कधी काळखभिन्न सन्नाटा

माणूस जिवंत असल्याची जाणवत नाही कोणती खूण, अशी आर्त, व्याकुळ तगमग कवितेत सर्वत्र भरून राहिली आहे.

पुष्पाग्रज यांच्या कवितेचा विशिष्ट असा एक ‘मूड’ आहे. त्यांची कविता तपशील, माहिती, भूमिकेचा अभिनिवेश, विशिष्ट इडियमचा टोकाचा आग्रह यांपासून चांगल्या अर्थाने मुक्त आहे. प्रचलित प्रतीके, प्रतिमा, मिथके ह्यांच्या आवरणाला भेदून सत्याचा लसलसता कोंब पकडू पाहणारी पुष्पाग्रजांची कविता वेदनेसोबत निरंतर प्रवास करणार्‍या अवघ्या समष्टीला शांती-अवेदनेची अर्थवत्ता प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना करणारी अस्तित्वलक्ष्यी कविता आहे.

-प्रज्ञा दया पवार
(शांती अवेदना (ग्रंथाली प्रकाशन) काव्यसंग्रहाच्या मलपृष्ठावरील मजकूर)

नरेंद्र बोडके यांची आणखी काही निरीक्षणे

... गोमंतकीय कवितेचे एक खणखणीत नाणे म्हणजे पुष्पाग्रज ! पुष्पाग्रज यांची कविता नकारभरल्या वास्तवाच्या संदर्भात प्रतिक्रिया म्हणून उद्भवताना दिसते. हे वास्तव फार भगभगीत झाले की तो आपले कॅलिडिस्कोपिक परिमाण जागे करतो आणि स्वप्न-वास्तवाच्या पातळीवरील एक स्वतंत्र जग त्याला त्यात दिसते. वास्तवाला भिडताना दु:खाच्या डोळेभेटीमुळे निर्माण होणारे आंतरिक ताण-तणाव त्याच्या कवितेतून प्रकट होत राहतात.
........
‘पुष्पाग्रज’(अशोक नाईक तुयेकर) यांच्या कवितेतही दु:खानुभव व्यक्त होतात. आयुष्यात येणार्‍या अनुभवांचे अर्थ शोधण्याचा प्रयत्न कवी करतो. आयुष्याबद्दल फार मोठ्या अपेक्षा बाळगल्या नाहीत, तरी आकस्मिक अपेक्षाभंगाचे दु:ख येतेच ! हे लक्षात आल्यावर कवी म्हणतो, 

‘या अवेळीच्या पानगळीला,
मी शिशिर कसे म्हणू ?’

पुष्पाग्रज यांचे ‘कॅलिडोस्कोप’(1983) ‘नन्रूख’(1992) व ‘शांतिअवेदना’(2010) असे तीन संग्रह त्यांच्या नावावर आहेत. एकाकीपणा, उदासीनता, निराशा, भय, अशाश्‍वता या दु:खानुभवांचे गडद रंग त्यांच्या कवितांमधून उमटतात. त्यांच्या कवितेच्या पुढच्या टप्प्यात समाजवास्तवही प्रगटले. ‘शांतिअवेदना’ या नव्या संग्रहात अस्तित्व शोधाची अनेक रूपे प्रकट झाल्याचे दिसते.

‘शांतिअवेदना’ हा असा एक आश्रम असतो, जिथे मृत्यूचे अंतिम सत्य घेऊनच माणसे प्रवेश करीत असतात. कर्करोगाने ग्रासलेल्या या माणसांना घराने नाकारलेले असते. अखेरच्या दिवसात त्यांच्या जखमांवर फुंकर घालणारी माणसेही याच जगातली असतात. ‘शांतीअवेदना’ हे सुसह्य मृत्यूचे आवतण देणारे एक अनोखे मंदिर असते. मृत्यूच्या वेढ्यात अडकलेली माणसे आणि त्यांचा झुंजार जिवटपणा या संग्रहात पुष्पाग्रजांनी शब्दात पकडला आहे. मानवी जीवन म्हणजे मृत्यूच्या प्रतीक्षेत शांतीअवेदना आश्रमात घालवलेला काळ आहे, अशा रूपकाच्या पातळीवर हा शब्द आपल्याला घेऊन जातो. शांतीअवेदनाच्या मलपृष्ठावर कवयित्री प्रज्ञा पवार यांनी नोंदविलेले निरीक्षण चिंतनशील आहे.

- नरेंद्र बोडके
(गोमंतकीय मराठी कवितेचे अर्धशतक, संपा. नरेंद्र बोडके, प्रका. नंदिनी तांबोळी, पुणे, 2010)

काही कविता


किती लक्ष वाटातुनी हिंडताना


किती लक्ष वाटातुनी हिंडताना
कसा गुंतलो ना वाटातुनी
कधी आडवाटातुनी पाय गेले
तरीही दिशा नादल्या पैंजणी
प्रवासात जेथे धुके भेटले ते
जरा वेचियेले शब्दातुनी
कधी शब्द गांधार होऊन आले
कधी दाटली अक्षरे डोळुलीं
उन्हाळाच आहे उभा रूक्ष दारी
चुकूनी कधी पावसाच्या सरी
अधाशीपणे चाखले थेंब पाणी
तयाची नशा व्यापली जीवनी
कवितेतूनी चित्र रेखियले ते
न आले कधी शब्द ओलांडुनी
जशा देव रंभा जळांतुनी येती
न्हाती परी कोरडी ही तळी
प्रवासास ऐसा निघालो जिथुनी
त्या वाटा पुन्हा आज खुणावती
मला माऊलीचे पडे स्वप्न देहीं
तिच्या गर्भगारात माझी मठी

गोकुळ

झुंजुमुंजू प्रहराकाठची ही
कृष्णसकाळ
धुक्यात लपेटलेले थर्थर गोकुळ
खूप काळचा आघात सावरीत, उभे स्थितप्रज्ञ...

यमुनेच्या जळात बुडणार्‍या
घड्यांचा आवाजही भयग्रस्त वाटतो अशावेळी
बावरलेली राधा...
असहाय्य पेंद्या...

अरे तुझी सोन्याची द्वारका
लुटली जात आहे रे कृष्णा...

प्रत्येकाच्या मनातून हरवत चालली आहे
बासरीची धून
बारमाही शिशिर ऋतूत सुलाखून
निघालेली वृक्षवल्ली
बेसहारा गुरांचे कळप हंबरणारे
वेळूच्या बनातून आता
नाहीच का ऐकू येणार हरीचा पावा ?

हे गोकुुळ
संजीवनीची वाट पहात...
आणि दूर दूर सरकणारे श्रावणघन

महाप्रलयाने दुथडी भरून वाहणारी यमुना
आणि पैलतीरावर तिष्ठत राहिलेला वसुदेव

देवकी, तुझ्या कुशी जन्माला येणारा
आठवा पुत्र
कृष्णच असेल यावर आता आमचा
विश्‍वास नाही
आता आमचा विश्‍वास नाही…मित्रा

मित्रा-
तू लिहितोस ‘तू सुखी आहेस ना!’
कठीण आहे दोस्त सांगणे आणि आहे संशयही
तुझ्या सुखाच्या व्याख्येत मी बसतो की नाही याचा
मृत्यूला देता येत नाही जोवर सुखाची उपमा
आणि अबाधित राहील अश्रूंचे पावित्र्य
मी सुखीच असेन तोवर

गावातल्या त्या काजर्‍याच्या थळावर
आपण टांगलेले हौशी कलाबुतांचे पडदे
असतील का रे अजून !
आता व्यावसायिक नाटकांतून हिंडतो इथे तिथे
ह्या रंग-बिरंग्यांच्या शहरात
रंग बदलत चालला आहे त्वचेचाही
फाटके मोजे घालून फिरता येत नाही येथे
वाटल्यास अनवाणी फिरावे
काहीना पायच नाहीत रे मोज्यांसाठी
तू सुखाचे विचारतोस

यंत्रवत आहे सारे यंत्रवत आहे
अवघे सारे मनुष्यत्व दूर जात आहे
कधी कदी मारला जातो माझ्यातलाही माणूस
मला भारते सणक हात पुढे करणार्‍या भिकार्‍याची

खूप दिवस झाले या प्रदेशात कोकिळेने गाणे गायचे
बंद केले आहे
त्याऐवजी घुघुत्कार ऐकू येतो
फॅक्टर्‍यांतून, कार्यालयांतून आणि निर्झाड गिरीकंदरातून

यार तू लिहितोस कुटुंबाच्या सौख्याविषयी
अगदी आबादी आबाद आहे
आहे एक पत्नी चार चौघांसारखी प्रेमळ
नाही कळत मात्र त्यात निकं सत्य किती
किती असहाय्यता

दोस्ता बाजारातही अलिकडे क्रांति झालिये फार
कोणी म्हणतात ते अद्भुत आहे, कोणी वास्तव
आपणही ठरवलेय आता मागे रहायचे नाही
म्हणून घरात आणतो आठ आण्याची झम्पाला कार,
एक रूपयाचे चॅलेंंजर यान
आणि दीड रूपयाचे मुलांचे अश्रू

सरते शेवटी ही व्यसने
त्यानीच तर अर्धे अधिक मरू घातले आहे मला
आणि खरे सांगू दोस्ता
जगण्यासारखे काहीच नव्हते जेव्हा
तेव्हा त्यांनीच तर जगविले होते अर्धे अधिक मला


नस

अनामिक वासाच्या ओढीनी
पुन्हा पुन्हा आपण जिते जन्म घेतले
तेच हे ठिकाण
पुन्हा पुन्हा मोह होतो जगण्याचा
वाटते कधीतरी नक्कीच येईल
सोनरी झुंबरांच्या मोहल्ल्यात अडकून पडलेला वारा

सांद्र घेरीच्या वेळी अनावर होऊन
मी घालत राहतो फुंकर
किती पाशवी बलात्कार झाले आपल्या आयुष्यावर
माळरानावर पतंग उडविता उडविता
ठेंगणे होत गेलेलं आपले अस्तित्व
ज्या वाटांवर फुले वेचली
तिथले दगड न्याहाळू लागतो मी
मला दिसू लागतात
मातीच्या गर्भगंधाने फुलून आलेली झाडे
तेच खरे दिवस होते तरी
गवताचे भारे माथ्यावर तोलता तोलता
मला आठवलेला चे गव्हेरा
वडिलोपार्जित जमिनीत मी शिंपडलेले चार दाणे
आणि पारव्यानी केलेला
अव्यापारेषू व्यापार

नंतरच्या रीत्या पोत्यात भेटलेल्या तुकाराम
रात्र काळी घागर काळीच्या दिवसांत
आपणच आपल्या शिस्नाशी
केलेले अविरत बलात्कार
अशा मैथुनमयी दिवसांतही
कुणा लक्ष्मीच्या योनीवरून हात फिरवताना
शरीराचा झालेला भुगा भुगा
फेसाळल्या मेंदूने समुद्राला अर्पण केलेली
एक पुर्णनग्न संध्याकाळ…

हेच ते ठिकाण
अजूनही त्याच वाटेवरून येतो-जातो मी
कशा कळाहीन झाल्या आहेत या वाटा
आताशा पुन्हा पुन्हा चाचपून पहातो
मी मला
किती जिवंत, किती मेलो आहे ते
अजून नस सापडायची आहे

रूजून येते मनात काही

रूजून येते मनात काही सजून येता दु:ख दिवाणे
या सजण्याने त्या रुजण्याला कैवल्याची फुटती पाने

दूरदूरच्या दर्‍या सुंदर्‍या जवळ जवळची खुरटी राने
मिटून जाता धुके दरीचे तृष्णेलाही फुटती पान्हे

जसे तुझे हे खुणेने गूढ कायसे मला सांगणे
अव्यक्ताच्या झाडाखाली व्यक्ताचे मग खुलते गाणे

लुटून नेले मला परीने सांजआंधळ्या हिर्व्या रानी
चंद्रबळाच्या स्निग्ध प्रकाशी उरलेसुरले नुरले जगणे


नक्षत्रांच्या मुळाशी पाऊस पडत आहे

पाऊस पडत आहे
नक्षत्रांच्या मुळाशी पाऊस पडत आहे
आंब्यांच्या आमराईत...जुईच्या जुईराईत
तल्खलीच्या लल्खलीवर...खणगणीच्या खणीमध्ये
कातरलेल्या कातळावर...मंद मऊ मातीवर
ताशांच्या तडतडीचा तडातड पाऊस पडत आहे

अंत:करणाच्या अनंत नगरीतील
स्पप्नांच्या सलील घरांवर शापोराच्या तीरावरती, आडीच्या आडकुशीत
झाडांच्या दाटीवाटीत वसलेल्या गावामध्ये
गावाकडच्या घरावरती, घराकडच्या ओस परसात
मुक्या मुक्या अंगणात मुसळांच्या धारांचा
जमदग्नी पाऊस पडत आहे

तट्ट तट्ट चोळीसारखा, गावरान पोरीसारखा
मुसमुसणार्‍या यौवनातला धसमुसळ्या मदनाचा
मंजिरी पाऊस पडत आहे...

सागराच्या छाताडावर, पहाडाच्या पाठीवर
माळावरच्या गवतामध्ये जलवंती नाचत आहे
पाऊस पडत आहे...
रक्तामधल्या कणाकणांत, त्वचेवरच्या रोमरोमांत
अव्यक्ताचा व्यक्त जसा
पाऊस पडत आहे…

मातेशी नाळ तुटून मातीशी नाते जुळले
भाळावरच्या आभाळावर ललाटाचे लेप आले
तेव्हाही तो असाच कोसळला
तिची भेट, त्याचे येणे
तिचे बिलगणे, याचे बिथरणे
एकांताच्या टोकावरती श्‍वासामध्ये श्‍वास रूतला
धुंवाधार बरसातीचा तेव्हा त्याने पडदा केला

सुलज्जेच्या चुर्‍यासारखा, मीनाक्षीच्या अक्षांसारखा
वक्षांवरच्या अक्षांशावर, घळीमधल्या रेखांशावर
पाठीवरच्या पनळावर, नितंबाच्या निसरडीवर
तेव्हासारखा आजही
रंभांचा रंभागर्भी पाऊस पडत आहे…

अलक्ष्यांच्या लक्षांमधला
आदीपासून अनादीचा...अल्लड आणि अवखळ
अनिवार्यतेचा पाऊस पडत आहे…

माझ्या अंतरीचा विठू

ओल्या मोसमात जिथे थोडी तुडवली माती
माती अंगांगे भिनली तुला अंकुर फुटती

मग सोडियले गाव आलो पंढरीच्या दारी
इथे विठ्ठलच मुका मुके मुके वारकरी

आधी चंद्रभागे न्हालो मग पुंडलिक झालो
जिथे तिथे तुकयाला हाका मारत हिंडलो

एक जनाईची ओवी ओवी शीलालेख झाली
तिचा अर्थ शोधताना वीट वितळून गेली

कसा सुटेना हा गुंता, फूल फांदिला धरेना
अरे, कवितेच्या देवा कधी गोठेल वेदना ?

पुन्हा गावाचेच वेध वाटे गावाला जायचे
माती माखून अंगाला खार्‍या पाण्यात न्हायचे

माती नांगरून शेती मळे फुलवीन जेव्हा
माझ्या अंतरीचा विठू रूजो येईल हो तेव्हा


(या कविता कवीनेच ब्लॉगसाठी निवडून दिल्या आहेत.  )